यानंतर १२वीच्या अभ्यासक्रमातील प्रत्येक धडा नीट वाचा. ( Line by line, Word by word ). प्रत्येक संकल्पना नीट समजावून घ्या.
पुन्हा एकदा सर्व धडे वाचायला घ्या. यावेळी सोबत कोरे कागद घेऊन बसा. यावर प्रत्येक धड्यातील सूत्रं ( Formulae) त्यातून मिळणा-या राशीची एक यादी करा. याच वेळी सर्व व्याख्या , गृहीतके , (Definitions, Assumptions, Postulate) लिहून काढा. यावर थिअरी प्रश्न येऊ शकतात.
तुमच्या शिक्षकांना विचारून बहुपर्यायी प्रश्नांचं एखादं चांगलं पुस्तक आणा आणि त्यातील प्रश्न ( Multiple Choice Questions) ) सोडवायला सुरुवात करा. प्रत्येक धड्यावरील किमान ३० प्रश्न तरी सोडवा. हे सोडवताना पहिले ३० न सोडवता ५च्या पाढ्यातील , म्हणजे ५वा , १०वा , १५वा असे प्रश्न सोडवा , कारण पहिले ३० प्रश्न एकतर धड्यातील पहिल्या काही भागांवर आधारित असतील किंवा सोपे असतील. आम्ही सुचवलेल्या पद्धतीने प्रश्न सोडवल्यास सर्व धड्यावरील प्रश्न सोडविले
जातील आणि पुरेसे अवघड प्रश्नही सोडवावे लागतील. अशा परीक्षांची इंटरनेटच्या माध्यमातून ऑनलाइन तयारी करुन घेणा-या वेबसाईटचाही चांगला वापर करु शकता. त्यात प्रश्नांची उत्तरं लगेच मिळतात आणि शंका आल्यास लगेचच्या लगेच शिक्षकांना विचारता येतात.
सर्व धड्यांवरचे असे किमान ३० प्रश्न तरी तुमच्या बारावीच्या परीक्षेपूर्वी सोडवून झाले तर त्याचा फायदा तुम्हाला बारावीच्या परीक्षेतही होईल, कारण बारावीच्या परीक्षेतही १४ मार्कांचे बहुपर्यायी प्रश्न असतील. १२वीची परीक्षा संपल्यावर अशीच ६० प्रश्नांची अजून एक फेरी पूर्ण करा. मग संपूर्ण अभ्यासक्रमावरील ५० गुणांची परीक्षा द्यायचा सराव करा. खरं म्हणजे फिजिक्स आणि केमिस्ट्री या दोन्हीच्या १०० गुणांच्या परीक्षेची तयारी करा तीही ९० मिनिटात सोडवण्याची.