सीसॅट- 2 या पेपरचे महत्त्व
एमपीएससी पूर्वपरीक्षा तसेच यूपीएससी पूर्वपरीक्षा उत्तीर्ण व्हायची असेल तर या प्रश्नपत्रिकेचा गांभीर्याने अभ्यास करायला हवा. याचे कारण सीसॅट पेपर-1 च्या (सामान्य अध्ययनाशी संबंधित पेपर) गेल्या दोन वर्षांतील प्रश्नांचे स्वरूप पाहता या उपघटकावर विशिष्ट गुणांहून अधिक गुण मिळवणे अवघड जाते. त्यामुळे ज्या विद्याथ्र्यांना सीसॅट पेपर-2 मध्ये गती असते, त्यांना अंतिम गुणवत्ता यादीत स्थान मिळवणे सोपे जाते. अभियांत्रिकी, विज्ञान आणि गणिताची पाश्र्वभूमी असणा-या विद्याथ्र्यांना सीसॅट पेपर - 2 चा अभ्यास काही प्रमाणात नक्कीच सोपा जातो. पण पेपर तयार करताना कुणा एका गटाला याचा फायदा होऊ नये, याची काळजी घेतली जाते. या पेपरमध्ये सुमारे 40 ते 45 टक्के प्रश्न हे आकलन या घटकावर विचारले जातात. वाचनवेग चांगला असलेल्या, घटनेचे आकलन करण्याची क्षमता चांगली असलेल्यांना या घटकावरील प्रश्न सोडवणे सोपे जाते. हा घटक कला शाखेच्या तसेच अभियांत्रिकी अथवा विज्ञानाची पाश्र्वभूमी असणा-या दोन्ही विद्याथ्र्यांना एकाच पातळीवर आणून ठेवतो. गणित व बुद्धिमत्ता या घटकावरील प्रश्नही अत्यंत मूलभूत असतात. साधारणत: त्यांचा दर्जा दहावी स्तरावरील परीक्षांचा असतो. त्यामुळे कला शाखेतील विद्यार्थी जेवढा जास्त सराव करतील, तितके अधिक गुण त्यांना या प्रश्नपत्रिकेत मिळवता येतील. जर गेल्या तीन वर्षांच्या प्रश्नपत्रिकेचा बारकाईने अभ्यास केला, तर असे लक्षात येईल की कोणत्याही एका वर्गासाठी हा पेपर अधिक फायदेशीर आहे असे म्हणता येणार नाही.
राज्यसेवा सीसॅटचे स्वरूप या प्रश्नपत्रिकेमध्ये खालील उपघटक समाविष्ट केलेले आहेत - आकलन, आंतरवैयक्तिक संवाद आणि संभाषणकौशल्ये, तार्किक विचार व विश्लेषणात्मक क्षमता, निर्णयप्रक्रिया व समस्यांची सोडवणूक, सामान्य बुद्धिमत्ता चाचणी, मूलभूत अंकगणितीय कौशल्य व सामग्री विश्लेषण, इंग्रजी भाषेचे आकलनकौशल्य. एमपीएससीने अंकगणितीय कौशल्ये आणि इंग्रजी भाषेचे आकलन या विषयाचे दहावीच्या स्तरावरील मानक निर्धारित केल्यामुळे विद्याथ्र्यांनी याचे भय बाळगण्याचे कारण नाही.
आकलनाची तयारी
आकलन म्हणजे समजून घेणे. यात उतार्यावरील प्रश्नांच्या आधारे उमेदवारांची आकलनक्षमता तपासली जाते. सीसॅट पेपर-2 सोडवताना मराठी आकलन क्षमता या विभागाला कमाल 55-60 मिनिटेच देता येतात आणि या ठरावीक वेळेत सुमारे 10-11 उतारे आणि त्यांवरील प्रश्नांची उत्तरे शोधावी लागतात. प्रश्न वाचण्यात घाई केल्यास अथवा चुकीच्या पद्धतीने सोडविण्याचा प्रयत्न केल्यास एकतर आपण चुकीचे उत्तर शोधू अथवा पर्याय वाचून मनात गोंधळ होऊन आपला वेळ खर्ची पडेल. परीक्षेमध्ये आकलनविषयक उतारे सोडविताना खालील मुद्दे लक्षात ठेवावेत. सर्वप्रथम उता-यांची संख्या किती आहे, लहान उतारे किती व मोठे उतारे किती आहेत, इंग्रजी उतारे किती आहेत हे पाहून वेळेचे नियोजन करावे.
उतारा एकाग्रतेने वाचावा.
उतारा वाचताना महत्त्वपूर्ण वाक्य पेन किंवा पेन्सिलने अधोरेखित करून ठेवावे. उता-यात लेखकाला काय मांडायचे आहे ते समजून घ्यावे. सर्वसाधारपणे उतार्यावरील प्रश्न हे खालील प्रकारचे असतात- उता-याला योग्य शीर्षक द्या, उतार्याचा मुख्य आशय स्पष्ट करा, उतार्यामध्ये दिलेली वस्तुनिष्ठ माहिती शोधा, लेखकाचा दृष्टिकोन स्पष्ट करा, उता-यावरून योग्य तो निष्कर्ष काढा. सर्वप्रथम उतारा वाचून नंतर प्रश्न सोडवावेत की प्रश्न वाचून उतारा सोडवावा, याबाबत मतेमतांतरे आहेत. आपला ज्या पद्धतीने सराव असेल व ज्या पद्धतीने वेळ वाचत असेल ती पद्धत स्वीकारावी, मात्र प्रश्न वाचून उतारा सोडविल्यास आपल्याला काय माहिती उतार्यातून जाणून घ्यायची आहे हे समजते आणि आपला वेळ वाचतो.