१.बौद्धिक दक्षता (मेंटल अलर्टनेस)
२.क्रिटिकल पॉवर ऑफ अॅसिमलेशन, समीक्षणात्मक दृष्टिकोनातून विचार आत्मसात करण्याची प्रवृत्ती.
३.स्पष्ट आणि तार्कीक स्पष्टीकरण.
४.परीक्षणातील समतोल.
५.छंद/आवड यामधील विविधता तसेच सखोलता.
६.सामाजिक दायित्व व समाजाभिमुखता.
७.बौद्धिक आणि नैतिक बांधिलकी.
संवादशैलीमध्ये खालील गोष्टींचा समावेश होतो.
१.विचारलेला प्रश्न नीट ऐकणे आणि समजावून घेणे.
२.प्रश्नाचे उत्तर योग्य शब्दांत तसेच योग्य पद्धतीने, शिष्टाचाराला अनुसरून देणे.
३.उत्तरातील महत्त्वाचे भाग सुरुवातीला सांगावेत किंवा प्रश्नाच्या अनुरूपतेनुसार मांडावेत.
४.उत्तर संपवतानाही योग्य पद्धत असावी. म्हणजे उत्तर अर्धवट न सोडता उत्तर संपल्याचे व्यवस्थित निदर्शनास आणून द्यावे. या ठिकाणी ज्ञान अथवा माहिती अपूर्ण असू शकते. पण उत्तर मात्र पूर्णच असले पाहिजे. मराठीमध्ये मुलाखत देणा-यांनीसुद्धा या गोष्टी लक्षात ठेवाव्यात. ब-याचदा उमेदवाराची मराठी भाषा खूप चांगली असते. पण जर तो चांगला संवाद करू शकत नसेल तर काही उपयोग होत नाही.
याउलट इंग्रजीमधून मुलाखत देणा-यांना भाषेवर प्रभुत्व नसल्याने न्यूनगंडदेखील येतो. मुलाखतीसाठी साधे व माहितीतले सामान्य शब्द वापरावेत. तसेच इंग्रजीची अवाजवी धास्तीसुद्धा बाळगू नये. यावर मात करण्यासाठी दररोज बोलीभाषासुद्धा इंग्रजीच वापरावी. म्हणजे यूपीएससीच्या व्यतिरिक्तसुद्धा इंग्रजीतून संभाषण करावे. इंग्रजीवर प्रभुत्व मिळवण्यासाठी याप्रकारे प्रयत्न केले तर संवादकौशल्ये सुधारण्यासाठी एक महिना पुरेसा आहे. यानंतर व्यक्तिगत प्रश्नांची तयारी करण्यासाठी पाश्र्वभूमी, शैक्षणिक पात्रता इत्यादीसंबंधीचे प्रश्न विचारात घ्या. याची उत्तरे ख-याखु-या पद्धतीने देण्याचा प्रयत्न करा. तसेच टेपरेकॉर्डर किंवा मोबाइल अशा कशामध्येही तुमचे उत्तर रेकॉर्ड करा. शक्य तितके महत्त्वाचे मुद्दे लिहून ठेवा. जे उत्तरासाठी साहाय्यभूत ठरतील. पण संपूर्ण उत्तरच लिहिणे चुकीचे आहे. कारण ही लेखी नाही तर तोंडी परीक्षा आहे.
अशाच प्रकार तुमचे सर्व व्यक्तिगत घटक, जिल्हा व राज्य इत्यादीबाबत तयारी करा. याबरोबर चालू घडामोडी, सद्यःघटना आणि संशोधने यावर लक्ष ठेवून त्यांच्यावरील प्रश्नांचे संच तयार करा.
एकदा बायोडाटावर पक्की तयारी झाली की मग नंतर सद्यघटनांकडे वळून त्यांची उत्तरे तयार करणे व त्याबद्दल मत अथवा भाष्य तयार करणे इत्यादी गोष्टी करा. चांगली माहिती जमवण्याच्या दृष्टीने मराठी विश्वकोश, इंटरनेट तसेच एखादे चांगले वाचनालय यांचा आधारसुद्धा घेतला जाऊ शकतो. अति प्रचंड साहित्य किंवा माहिती यांच्यामागे पळू नका. त्यापेक्षा माहीत असलेल्या गोष्टी व्यवस्थित सांगता याव्यात, यासाठी संभाषणकला याबाबतीत सुधारणा आणण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करावेत.
प्रत्यक्ष मुलाखतीचा दिवस
मुलाखतीच्या आदल्या रात्री शांत व पुरेशी झोप घ्यावी. मुलाखत सकाळच्या सेशनमध्ये असेल तर व्यवस्थित नाष्टा घ्यावा व दुपारी असेल तर हलका आहार-दुपारचे जेवण घ्यावे. मुलाखतस्थळी सर्व आवश्यक कागदपत्रांसहित (यूपीएससीचे कॉल लेटर, १० वीचे सर्टिफिकेट, पदवी प्रमाणपत्र, जातीचा दाखला (आवश्यकता असल्यास) इत्यादी वेळेच्या थोडे अगोदर पोहोचणे गरजेचे आहे. तिथल्या परिस्थितीशी स्वतःला जुळवून घ्या. स्वतःला शांत व स्थिर ठेवण्याचा प्रयत्न करा. नकारात्मक विचारांना मनामध्ये शिरकाव करू देऊ नका. सावकाश बोला व मन स्थिर राहू द्या. तुमच्या इंटरव्ह्यू पॅनेलचे नाव पाहून आश्चर्य किंवा भीती वाटून घेऊ नका.
मुलाखतीच्या सभागृहात जाण्यापूर्वी स्वतःला एकदा आरशात पाहून घ्या. थोडी उदासीनता आणि अस्वस्थता या प्रत्येक उमेदवाराला जाणवणा-या सामान्य गोष्टी आहेत. पण त्या गोष्टींना तुमच्या वरचढ होऊ देऊ नका संतुलित राहून उत्तम कामगिरी करा.