मुलाखतीची तयारी- सर्वसाधारपणे मुलाखतीविषयी निवडमंडळाचा (पॅनलचा) दृष्टिकोन सकारात्मक असतो. मुलाखत ही उमेदवाराची निवड करण्यासाठी असते, त्याला नाकारण्यासाठी नाही. म्हणूनच, उमेदवाराचा मुलाखतीच्या पॅनलकडे पाहण्याचा दृष्टिकोनसुद्धा सकारात्मक असायला हवा. 40 पैकी निवड होण्यासाठी किमान 30 ते 32 गुणांचे लक्ष्य डोळ्यासमोर ठेवून तयारी करावी, म्हणजे नक्की निवड होऊ शकेल. `पीएसआय' भरतीच्या मुलाखतीत आणि इतर मुलाखतीत फरक असतो. तो म्हणजे `पीएसआय' मुलाखतीची प्रक्रिया ही उमेदवार तत्सम पदांसाठी किती योग्य आहे हे तपासण्यासाठी असते. म्हणजेच ही ज्ञान चाचणी किंवा कल चाचणी नसून व्यक्तिमत्त्व चाचणी असते. सर्वसाधारणपणे प्रशासकीय सेवेतील मुलाखती अधिक औपचारिक असतात. यामध्ये प्रोटोकॉल ची जाण, वरिष्ठ पदांचे भान या बाबी अपेक्षित असतात. पीएसआय चे पद हे एकात्मिक सेवा आणि कायदासुव्यवस्थेशी थेट निगडित असल्याने उमेदवारांकडून शिस्तीची अपेक्षा अधिक असते. त्यामुळे उमेदवारांचे सादरीकरण व देहबोली सकारात्मक असायला हवी. मुलाखतीच्या तयारीची सुरुवात नेमकेपणाने करावी.
एखादा उमेदवार मुलाखतीच्या पॅनेलसमोर जाण्यापूर्वी निवडमंडळाकडे त्याचे प्रोफाईल आणि एक क्रमांक असतो. जेव्हा उमेदवार पॅनलला सामोरा जातो, तेव्हा त्या क्रमांकाला एक मूर्त स्वरूप प्राप्त होते आणि मग तुमच्या अर्जाच्या आधारित असे प्रश्न तुम्हांला विचारले जातात. पॅनलचा स्टार्टिग पॉइंट जर तुम्ही भरून दिलेला अर्ज असेल तर तुमच्या तयारीचा स्टार्टिग पॉइंटसुद्धा तुमचा अर्ज असायला हवा. मुलाखतीची तयारी सुरू करताना तुम्ही आयोगाकडे अपलोड केलेल्या अर्जाचे व्यवस्थित वाचन व निरीक्षण करा. त्याकडे तटस्थ व वस्तुनिष्ठ दृष्टिकोनातून पाहा, तुमच्या अर्जामधील कोणती बाब उठून दिसते, हे लक्षात घ्या. उदा. शिक्षण, नोकरीचा अनुभव किंवा अभाव, शिक्षणेतर कामगिरी अथवा सहभाग इ. या व्यतिरिक्त पोलीस खात्याचे ज्ञान (सध्या हा घटक मुख्य परीक्षेच्या अभ्यासक्रमातही अंतर्भूत आहे.) तसेच काही महत्त्वाच्या चालू घडामोडी यांचे योग्य सादरीकरण मुलाखतीत करता यायला हवे.
हे लक्षात घ्या, की मुलाखत हा तुमच्या निवड प्रक्रियेतील अंतिम व महत्त्वपूर्ण भाग आहे. मुलाखतीची तयारी म्हणजे स्वत:ला अधिक चांगल्या प्रकारे ओळखण्याची प्रक्रिया! स्वत:चे गुण-दोष जाणून घेत त्यावर नियंत्रण ठेवण्याची ही अनमोल संधी आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे मुलाखतीच्या पॅनलमधील वरिष्ठ आणि तज्ज्ञ मंडळींसोबत वैयक्तिक चर्चा करण्याची तुम्हाला मिळालेली ही संधी आहे.